Type Here to Get Search Results !

नसरापूर येथील चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या-नागठाणे विभाग पत्रकार संघाची मागणी

 नसरापूर येथील चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या-नागठाणे विभाग पत्रकार संघाची मागणी

नागठाणे-प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून, या घटनेचा निषेध करण्यासाठी नागठाणे विभाग पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. या अमानवी घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघाच्या वतीने बोरगाव पोलीस स्टेशन येथे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच अशा विकृत आणि अत्याचारी आरोपींना भविष्यात कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देऊ नये व त्यांचा पॅरोल कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. समाजात वाढत चाललेल्या महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा नराधमांना कायद्याचा कठोर धाक दाखवणे गरजेचे असल्याचे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नसरापूर येथील या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, विविध सामाजिक संघटना, नागरिक तसेच पत्रकार संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अल्पावधीत अटक केली असून, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

या निवेदनावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पंचपोर, जेष्ठ पत्रकार सुनिल शेडगे, विकास जाधव, प्रताप भोसले, किरण पवार, मधुकर कणसे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता घाडगे उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments