Type Here to Get Search Results !

बोरगाव पोलिसांची प्रभावी पैरवी

बोरगाव पोलिसांची प्रभावी पैरवी; सात वर्षांनंतर मारहाण प्रकरणातील आरोपीस दोषसिद्धी
वेणेगांव, प्रतिनिधी : बोरगाव पोलीस ठाण्याने सन २०१९ मधील मारहाण प्रकरणात प्रभावी तपास व न्यायालयीन पैरवी करून आरोपीस दोषी ठरविण्यात यश मिळविले आहे. माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय, सातारा यांनी आरोपी गजानन शंकर कांबळे यास दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
दि. २८ मार्च २०१९ रोजी पाडळी (ता. जि. सातारा) येथे फिर्यादी दादासाहेब शंकर कांबळे यांच्या घरासमोर शेती व घराच्या वादातून आरोपींनी वाद घालत लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली होती. तसेच वाद सोडविण्यास आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४/२०१९ अन्वये भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक बी. एस. इंगुळकर यांनी केला. न्यायालयात एकूण सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. सरकारी पक्षातर्फे व्ही. वाय. बडवे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच पैरवी अंमलदार पोलीस हवालदार व्ही. एल. आंब्राळे व पोलीस हवालदार पी. एन. फरांदे यांनी न्यायालयीन कामकाजात मोलाची भूमिका बजावली.
दि. ४ जून २०२६ रोजी मा. मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही. एम. कऱ्हाडकर यांनी आरोपी गजानन कांबळे यास दोषी ठरवून भादंवि कलम ३२४ अन्वये कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व ५ हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास ३० दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या यशस्वी दोषसिद्धीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तुकाराम हुले, तपास अधिकारी व पैरवी पथक यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बोरगाव पोलिसांनी केलेल्या काटेकोर तपासामुळे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे आरोपीस शिक्षा झाली असून कायद्यावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.




Post a Comment

0 Comments