Type Here to Get Search Results !

GPR प्रणालीत साताऱ्याची दमदार कामगिरी; एका महिन्यात ७० हजार दाखल्यांचे वितरण

 GPR प्रणालीत साताऱ्याची दमदार कामगिरी; एका महिन्यात ७० हजार दाखल्यांचे वितरण

सातारा, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राबविलेल्या GPR (Government Process Re-engineering) प्रणालीमुळे सातारा जिल्ह्यात महसूल सेवांच्या वितरणात मोठी गती आली असून नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्रे सुरळीत आणि जलद गतीने उपलब्ध होत आहेत. जिल्हा प्रशासन, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आपले सरकार सेवा केंद्रे, महा ई-सेवा केंद्रे आणि महा आयटी यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे सातारा जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.

महसूल विभागाच्या विविध सेवांचे सुलभीकरण झाल्याने उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अधिकार अभिलेखांच्या प्रती तसेच इतर अनेक दाखले नागरिकांना कमी कालावधीत उपलब्ध होत आहेत. सेवा वितरण प्रक्रियेतील अनावश्यक टप्पे कमी झाल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होत आहे.

सातारा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी महसूल सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वेळोवेळी आढावा बैठका घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, सेवा वितरणातील अडथळे दूर करणे आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रे आणि महा ई-सेवा केंद्रे ही शासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या ऑनलाइन सेवांचा लाभ त्यांच्या गावाजवळच उपलब्ध करून देण्यात या केंद्रांची भूमिका अत्यंत मोलाची ठरत आहे.

यासोबतच महा आयटीच्या सातारा जिल्हा व्यवस्थापकांनी GPR प्रणाली अधिक सुरळीत व कार्यक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सेवा वितरण प्रक्रियेचे नियमित निरीक्षण, तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण, सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शन तसेच महसूल विभागाशी सातत्यपूर्ण समन्वय यामुळे जिल्ह्यातील सेवा वितरणाला अधिक गती मिळाली आहे.

विशेष म्हणजे मे २०२६ या एकाच महिन्यात सातारा जिल्ह्यात सुमारे ७० हजार विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले, ही बाब जिल्ह्याच्या कार्यक्षम प्रशासनाची आणि GPR प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीची साक्ष देणारी ठरत आहे. नागरिकांना वेळेत सेवा मिळाव्यात यासाठी महसूल यंत्रणा, महा आयटी आणि सेवा केंद्रांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांना यश मिळाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

GPR प्रणालीमुळे सातारा जिल्ह्यात महसूल सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख बनल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते गावपातळीवरील महा ई-सेवा केंद्रांपर्यंत सर्व घटकांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांमुळे सातारा जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरत आहे. नागरिकांना जलद, विश्वासार्ह आणि सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यात सातारा जिल्ह्याने उभारलेला हा आदर्श निश्चितच कौतुकास्पद मानला जात आहे.



Post a Comment

0 Comments