Type Here to Get Search Results !

अजित ताटे यांच्या सतर्कतेला सचिन घाडगे यांच्या हुशारीची जोड; बनावट चांदीचे पैंजण विक्रीचा डाव उधळला

 अजित ताटे यांची सतर्कता अन् सचिन घाडगे यांची हुशारी आली कामी; बनावट चांदीचे पैंजण विक्रीचा प्रयत्न उधळला

नागठाणे, प्रतिनिधी : नागठाणे येथील बाजारपेठेत बनावट चांदीचे पैंजण विकून सराफ व्यावसायिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न स्थानिक व्यावसायिकांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. चौडेश्वरी ज्वेलर्सचे संचालक अजित ताटे यांची सतर्कता आणि मातोश्री ज्वेलर्सचे संचालक सचिन (अनिल) घाडगे यांची हुशारी यामुळे संशयित महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नफिसा बानू अन्सारी (रा. बेगुन, जि. चित्तोडगड, राजस्थान) ही महिला सोमवारी दुपारी दोन जोड चांदीचे पैंजण विक्रीसाठी चौडेश्वरी ज्वेलर्समध्ये आली. पैंजण शुद्ध चांदीचे असल्याचा दावा तिने केला. मात्र तिच्या संशयास्पद हालचालीमुळे संचालक अजित ताटे यांनी पैंजणांची बारकाईने तपासणी केली. तपासणीदरम्यान पैंजणांवर केवळ चांदीचा मुलामा असून आतील धातू वेगळाच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सावध होत बोरगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान, टोळीतील दुसऱ्या महिलेने शेजारील मातोश्री ज्वेलर्समध्ये जाऊन सुमारे ९८ ग्रॅम वजनाचे बनावट पैंजण विक्रीचा प्रयत्न केला. दुकानातील कर्मचाऱ्याने सुरुवातीला व्यवहार करून सुमारे नऊ हजार रुपये दिले. मात्र काही क्षणांतच संचालक सचिन (अनिल) घाडगे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी त्वरित पैंजणांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, संबंधित महिला तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र घाडगे यांनी प्रसंगावधान राखत तिचा पाठलाग करून तिला पकडले व दिलेली रक्कम परत घेतली. त्यानंतर त्यांनी तात्काळ बोरगाव पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून या प्रकारामागे आणखी साथीदार असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सराफ व्यावसायिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य आर्थिक फसवणूक टळली असून नागठाणे परिसरात अजित ताटे आणि सचिन घाडगे यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Post a Comment

0 Comments