Type Here to Get Search Results !

बोरगाव पोलिसांचा दणका! अवघ्या पाच तासांत सराईत दुचाकी चोर गजाआड; ₹३.९२ लाखांच्या १० चोरीच्या मोटारसायकली जप्त

बोरगाव पोलिसांचा दणका! अवघ्या पाच तासांत सराईत दुचाकी चोर गजाआड; ₹३.९२ लाखांच्या १० चोरीच्या मोटारसायकली जप्त

वेणेगांव, प्रतिनिधी : वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करत बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासांत सराईत दुचाकी चोराला जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आरोपीकडून तब्बल ₹३ लाख ९२ हजार किमतीच्या १० चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बोरगाव पोलिसांच्या तत्परता, नियोजनबद्ध तपास आणि धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूनगर, गोडोली (सातारा) येथील युवराज कृष्णाजी लोहार यांच्या मालकीची होंडा सीबी हॉर्नेट मोटारसायकल मौजे अतित, ता. सातारा येथून चोरीस गेल्याची तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीदारांचे जाळे आणि बारकाईने केलेल्या तपासाच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपी रविराज उर्फ बबलू विलास माने (वय २५) याला ताब्यात घेतले.

पोलिसी चौकशीत आरोपीने सातारा व पुणे शहर परिसरातून एकूण १० मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या १० चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत ₹३ लाख ९२ हजार इतकी असून, या कारवाईमुळे अनेक वाहनमालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वीही पुणे शहरात वाहनचोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा सराईत वाहनचोर असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

अत्यल्प वेळेत गुन्ह्याची उकल, आरोपीला अटक आणि मोठ्या प्रमाणावर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची ही कामगिरी सातारा जिल्हा पोलिसांसाठी उल्लेखनीय मानली जात आहे. गुन्हेगारांवर प्रभावी वचक निर्माण करण्याबरोबरच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ही कारवाई ठरली आहे



Post a Comment

0 Comments