चिंचणेर निंब येथे ३५ शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे वाटप; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
वेणेगाव | प्रतिनिधी
कृषी दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांच्या वतीने चिंचणेर निंब येथे आयोजित कार्यक्रमात समूह आद्यरेखा प्रात्यक्षिक अंतर्गत ३५ शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 'फुले दुर्वा' वाणाचे सोयाबीन बियाणे मोफत वितरित करण्यात आले. यावेळी आधुनिक शेती, पशुपालन, परसबाग व फळबाग व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात डॉ. महेश बाबर यांनी 'फुले समृद्ध गाव' उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली. भूषण यादगीरवार यांनी बांधावरील आंबा व नारळ लागवड तंत्रज्ञान तसेच भेंडी लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
सागर सकटे यांनी चारा व्यवस्थापनाचे महत्त्व सांगून स्टायलो चारा पिकाच्या बियाण्यांचे वाटप केले. तर डॉ. कल्याण बाबर यांनी परसबाग निर्मिती, पोषणमूल्ये आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करत महिलांना भाजीपाला बियाण्यांचे वितरण केले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचणेर निंब येथे भेट देऊन परसबाग निर्मितीचे नियोजन तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने मियावाकी वन संकल्पनेवर चर्चा करण्यात आली. शाळेलाही भाजीपाला बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
संग्राम पाटील यांनी सोयाबीन बीजप्रक्रिया व बीबीएफ लागवड तंत्रज्ञानाची माहिती दिली. कार्यक्रमास सुजय शिंदे, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले तसेच खरीप हंगामासंदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे तज्ज्ञांकडून समाधान करण्यात आले.

Post a Comment
0 Comments